लग्नसराईनंतर मंडप व डेकोरेटर्स व्यावसायिकांचा मंदावलेला व्यावसाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तेजीत आला आहे. या मंदावलेल्या व्यवसायाला गणरायांच्या आगमनासोबत उभारी मिळत असून, यंदा उत्सवादरम्यान पावसाचे वातावरण असल्यामुळे गणेश मंडळांनी मंडप डेकोरेटर्सकडून प्लॅस्टिकच्या आवरणासह मंडप उभारून घेतल्याने दरवर्षापेक्षा व्यावसायिकांना अधिकचे काम मिळाले आहे. तर काही मंडळांनी उत्सव सुरू झाल्यानंतर प्लॅस्टिक ताडपत्रीची मागणी केल्याने मंडप डेकोरेटर्संना यावर्षी अधिक काम आणि उत्पन्न मिळत आहे. नियमांमधील बदलांमुळे कमीत कमी जागेत आकर्षक देखावा उभारण्याचे आव्हान गणपती मंडळांसमोर असून, त्यासाठी सुसज्ज, मजबूत मंडपाची आवश्यकता असते. त्यामुळे गणेशोत्सवात मंडप व्यावसायिकांना महत्त्व प्राप्त होते. मजबूत मंडपांची बांधनी करून आकर्षक देखावे उभारून देण्यातही मंडप व्यावसायिकांचा मोठा सहभाग असतो. दहा दिवस मंडपासोबत कारागिरांनाही रोजगार मिळतो. त्यामुळे पुढील नवरात्रोत्सव, लग्नसराईत पुन्हा कारागिरांची शोधाशोध करावी लागत नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडप डेकोरेटर्स खºया अर्थाने साहित्याची व माणसांचीही जुळवाजुळव पूर्ण होते. काही लहान मंडळांना मंडप उभारून दिल्यानंतर कारागिरांना अन्य मध्यम स्वरूपाच्या मंडपाची देखभाल दुरुस्तीची कामे सापवली जातात. त्यामुळे मन्युष्यबळाचीही बचत होते. लहानात लहान मंडळाकडून मंडप डेकोरेटर्स एक हजार प्रतिदिवसाप्रमाणे १२ दिवसांत बारा हजार रुपये शुल्क आकारतात. तर मध्यम स्वरूपाच्या मंडळांकडून पाच ते सात हजार रुपयांप्रमाणे ६० ते ८० हजार रुपये व मोठ्या गणपती मंडळांकडून प्रतिदिवसाला दहा ते बारा हजार रुपयांप्रमाणे एक ते सव्वा लाख रुपये शुल्क आकारले जातात. यावर्षी गणेशोत्सव १० दिवसांऐवजी १२ दिवस चालणार असल्याने मंडप व्यावसायिकांना दोन दिवसांचा अतिरिक्त व्यवासाय मिळत आहे. मात्र, पावसामुळे साहित्याचे नुकसान होत असल्याने अतिरिक्त रक्कम नुकसान भरून काढण्यासाठीच लागणार आहे.लहान मंडप व्यावसायिकांकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि साहित्याच्या अभावामुळे मोठ्या मंडळांची कामे घेता येत नाही. परंतु परिसारातील लहान, मोठी कामे मिळत असल्याने पावसाळ्यात मंदावलेल्या व्यवसायाला काही प्रमाणात का होईना चालना मिळते. अत्याधुनिक यंत्रणा आणि मोठा सेट असलेल्या व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्वणीच असते.- दिनेश घाडगे, मंडप डेकोरेटर्स, पवननगर, नाशिक
मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:21 AM