अंदरसूल : देवळाणे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अकस्मात आग लागून स्वस्त धान्य दुकानासह मंडप साहित्याचे गुदाम आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.बी.आर. काळे यांचे नावे असलेले देवळाणे-तिळवणी रोडलगतचे स्वस्त धान्य दुकान नंबर ८५, तसेच शेजारील गाळ्यातील नवनाथ गांगुर्डे यांच्या मंडप साहित्याच्या गुदामाला रात्री ३ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ, साखर, इलेक्ट्रॉनिक्स वजन-काटे, थंब मशीन, टेबल-काउण्टर, गल्ल्यातील चार हजाराची रोकड आदी साहित्य जळून खाक झाले. लगतच्या गाळ्यातील मंडप साहित्य गोडाऊन जळून खाक झाले. यात एक लाख रुपये किमतीचे त्रिफेज डिझल जनरेटर, सिंगलफेज पेट्रोल जनरेटर, ९० शामियान्याचे छत, पाइप पॅडल ८५ छत, ८० साइट पडदे, पाच लाख रुपयांची साउण्ड सिस्टीम, ५० गाद्या, ५० चटई, प्लॅस्टिक ताडपत्र्या, दोन महाराजा खुर्च्या, दुकानाच्या शटरसह छताचे पत्रे जळाले.देवळाणे सरपंच महेंद्र जाधव यांनी घटना घडताच अग्निशमन दलाला खबर दिली. सरपंच जाधव यांच्यासह गावकरी आग विझवण्यासाठी मदतीला धावले. बोकटे येथील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, मंडप मालक नवनाथ गांगुर्डे, नवनाथ दाणे, अविनाश काळे, ज्ञानेश्वर काळे, संतोष काळे, महेंद्र जाधव, सतीश काळे, शिवाजी दाणे, कांतिलाल जाधव, मिलिंद जाधव, पप्पू दाणे, दीपक जाधव, राहुल जाधव आदींनी मदत केली. गावकऱ्यांच्या सतर्कतेने गावालगत असणारी इतर घरे, पाचटाची कोपी, जनावरांचा चारा या आगीतून सुदैवाने वाचला. सदर घटनेत स्वस्त धान्य दुकानचालकाचे सुमारे साडेतीन लाख रुपये तर मंडप साहित्य मालकांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, सदर घटनेचा पंचनामा तलाठी शेंडे यांनी केला असून, पुढील तपास येवला ग्रामीणचे एएसआय तांदाळकर यांच्यासह पोलीस हवालदार पगार, उगले करत आहे.
मंडप गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:14 PM