लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : सिडकोतील पवननगर मार्ग हा रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असला तरी त्याचा ताबा अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहेच, परंतु वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने हा मार्ग आणि चौक हा जणू विक्रेत्यांच्या मालकीचा झाला आहे.
नाशिक महापाालिकेच्या वतीने दिव्या ॲडलॅब ते पवननगर दरम्यान सुमारे दीड किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. त्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, या रस्तयावर अतिक्रमणे वाढल्याने रुंद रस्ताही कमी झाला आहे. पंधरा मीटर रुंदीचा हा रस्ता अतिक्रमणामुळे आता जवळपास बारा मीटर झाला आहे. विक्रेत्यांची अतिक्रमणे झाल्याने हा प्रकार आढळल असून, त्यामुळे रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. मनपा मात्र रस्ता मोकळा करण्याबाबत उदासीन आहे.
----------------
हातगाडीबरोबरच पक्के अतिक्रमण
कोरोनामुळे या मार्गावर गेले पाच ते सहा महिने तुरळक विक्रेते होते. मात्र, आता फेरीवाला, हातगाडी चालकांची संख्या वाढली आहे. यात सर्वधिक संख्या हातगाडीवर विक्री करणाऱ्यांची आहे. दुकानदारांनीदेखील पुढे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.
----------------------
इन्फो...
सिडकोच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सिडको महाविद्यालयाकडे जाणारा हा मार्ग असून जवळ शाळा असल्याने पाल्यांना सोडण्यासाठी जाणाऱ्या वाहनचालकांना मेाठी करसत करावी लागत आहे.
इन्फेा...
आधीच अतिक्रमणे, त्यात मोकाट जनावरे अशी या रस्त्याची समस्या आहे. त्यामुळे वाहनचालकांचे अपघात ही नित्याची बाब झाली आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणे हटवण्यासदेखील राजकीय विरोध होतो.
--------------
महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही कायम सुरू असते. पवननगर भागात बांधकाम करून व्यावसायिकांनी पुढे अतिक्रमण कले असेल तर तर त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येईल. भाजीपाला आणि अन्य व्यावसायिकांचे अतिक्रमणाबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- मयूर पाटील,
विभागीय अधिकारी