नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, दिंडोरी व निफाड नगरपंचायतींच्या एकूण ८७ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदानास प्रारभं झाला. २९२ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. सकाळी थंडी अधिक असल्याने मतदारांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. मात्र सकाळी ११ वाजेनंतर मतदानाचा वेग वाढू लागला आहे. ११.३० वाजेपर्यंत सुरगाणा नगरपंचायतसाठी ३३.५ टक्के, निफाड नगरपंचायतसाठी १८.९० टक्के तर पेठ नगरपंचायतसाठी ३८.४२ टक्के मतदान झाले होते.
ठिकठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यासाठी उमेदवारांसह, पक्षाचे नेते, समर्थकांनी गर्दी केली आहे. दिंडोरी नगरपंचायतींसाठी सकाळच्या सत्रात मतदानांला मतदारांचा अल्प प्रतिसाद. किन्नर बांधवांनी आपला मतदानांचा अधिकार नोंदविला. सकाळी १० वाजेपर्यंत थंडी असल्याने मतदार मतदान केंद्रावर कमी गर्दी पाहायला मिळली. ११वाजेनंतर मतदारांमध्ये उत्साह वाढला व आता पालखेड रोड व स्वामी समर्थ रोड वरील केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढु लागली आहे. सहाही नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण ६२ हजार ६७९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानाकरिता १४८ इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणुकीत ८७ जागांवर २९२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत, तर चार जागांवर यापूर्वीच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दिंडोरी नगरपंचायतीत १४ जागांसाठी ४१, सुरगाण्यात १७ जागांसाठी ६४, पेठला १७ जागांसाठी ७२, कळवणला १४ जागांसाठी ३९, देवळ्यात ११ जागांसाठी ३३ तर निफाडला १४ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.