पिंपळगाव बसवंत : शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल पाळल्याचे आपण अनेकदा पाहतो. परंतु, एखाद्या मोराला तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यविधी केल्याचे दुर्मिळ दृश्य नुकतेच पिंपळगाव बसवंत परिसरात पाहायला मिळाले. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील शासकीय रोप वाटिका या भागातील विद्युत ताराच्या खाली मृत अवस्थेत मोर पशुपक्षीप्रेमी बाळासाहेब आंबेकर व स्वप्नील देवरे यांना जखमी अवस्थेत आढळला असता त्यांनी वडणेर विभागाच्या वन विभागाला घटनेची माहिती तात्काळ कळविली असता त्या मृत मोराला वनविभागाने पिंपळगाव पशुवैधकीय रूग्णालयात नेऊन पशु वैधकीय अधिकारी अल्पेश चौधरी यांनी मोराचा मृत्यू घोषित करत त्यांचे शवविच्छेदन करून. मोराचे शव वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.मोर हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संवर्धन अनुसुची-1 मधील पक्षी आहे. तसेच भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर गणला गेला आहे. मोराला राष्ट्रीय पक्षी पक्ष्याचा दर्जा देण्यात आल्यामुळे भारतीय संविधानानुसार मोराचा दफनविधी करण्यापुर्वी राष्ट्रध्वजामध्ये त्याचे शव ठेवत मानाचा सन्मान वनविभागाकडून देण्यात आला.यावेळी वनविभागाचे अधिकारी देविदास चौधरी, वाल्मिक निर्भवणे, वसंत देवरे, निलेश गाईखे, सुनील महाले, पशु वैधकीय अधिकारी अल्पेक्ष चौधरी, कुणाल धनवटे, वृंनचारक कारभारी तर पशु पक्षी प्रेमी बाळासाहेब आंबेकर, स्वप्नील देवरे आदी उपस्थित होते,