नाशिक- वेळ सकाळी साधारणत: साडेनऊ वाजेची... कॉलेजरेाडसारखा रहदारीचा मार्ग.. वर्दळ सुरू असताच अचानक मोर अवतरला आणि आकर्षणामुळे अनेक जण थबकले. मेारानेही गर्दी बघून मग एसएमआरके महाविद्यालयात उडी घेतली आणि तेथील झाडीत विसावला. बुधवारी (दि. ४) हा प्रकार घडला. एचपीटी कॉलेजजवळ दुभाजकातून जाणारा मोर दिसल्याने अनेक जण थांबले काही जण त्याचे फोटोही काढू लागले. ग्रीन आर्मीचे तन्मय दीक्षित यांनी मोराला बघितले आणि गर्दीतून त्याला वाचवण्यासाठी पुढे धावले. दरम्यान, मेार एसएमआरके महाविद्यालयाच्या गर्द झाडीत शिरला. त्यानंतर दीक्षित यांनी वन संरक्षक कार्यालयाला कळवले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मोराला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे तपासणी केली. या मोराच्या शरीरातील पाणी कमी झाले हाेते, तसेच काहीसे खरचटले होते. त्याला त्र्यंबकरोडवरील वनखात्याच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांनी आता या मोराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी केली जाणार असून त्यानंतर तो अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.
कॉलेज रोडवर मोर, पक्षीमित्रांच्या जीवाला घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2022 1:33 AM