नाशिक जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन घेतले जात असले तरी दिवसागणिक बाजरीचा पेरा कमी होऊ लागल्याने गुजरात राज्यामधून मोठ्या प्रमाणात बाजरीचे आवक होत असते. येथील बाजरी स्वच्छ आणि निर्मळ असल्याने व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांकडूनही या बाजरीला पसंती दिली जात असते.
बाजरीचा पेरा झाला कमी
जिल्ह्यात खरिपातील बाजरीचे क्षेत्र साधारणत १ लाख १७ हजार ५०४ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात ८००५५ हेक्टर इतक्याच क्षेत्रावर बाजरीचा पेरा झाला होता. बाजरीपेक्षा खरिपात मका, सोयाबिनचे पीक घेणे शेतकऱ्यांना परवडू लागल्याने अनेक शेतकरी केवळ घरी खाण्यापुरतीच बाजरी पिकवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
म्हणून थंडीत खावी बाजरी
हिवाळ्यात शरीरातील अंतर्गत उष्णता टिकून राहाण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहाते बाजरीत अनेक पौष्टिक गुणधर्म असल्याने अनेक डॉक्टर हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे गव्हाची चपाती किंवा तांदळाचा भात खाण्यापेक्षा बाजरी खाणे आरोग्यदायी असते. मधुमेही रुग्णांना बाजरीचे अनेक फायदे होत असतात.
का वाढले भाव?
दिवसागणिक बाजरीचे उत्पादन कमी होत आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळेही काहीवेळा बाजरीच्या पिकाचे नुकसान होत असल्याने बाजरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजरीच्या आवकेवर परिणाम झाल्याने बाजरीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
म्हणून पेरली जात नाही बाजरी
खरिपात आम्ही केवळ घरी खाण्यापुरती बाजरी पिकवतो. बदलत्या ऋतुचक्रामुळे बाजरीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. अनेकवेळा अतिवृष्टी किंवा वावधानामुळे बाजरीचे पीक आडवे होते यामुळे बाजरी काळी पडते. काळी बाजरी सहसा कुणी घेत नसल्याने बाजरी पिकविणे परवडत नाही. - अशोक पगारे, शेतकरी
मकापेक्षा बाजरीच्या पिकाला खूपच मेहनत घ्यावी लागते. शिवाय एकरी उत्पादनही कमी होते यामुळे खर्चाची तोंडमिळवणी होत नाही काहीवेळा उत्पादन चांगले येऊनही बाजरीला फारसा भाव मिळत नसल्याने आम्ही बाजरी घेण्याचे टाळतो. - देवराम रसाळ, शेतकरी
बाजरीचे दर (प्रतिक्विंटल)
२०१९ - २२००
२०२० - २४००
२०२१ - २६००