नाशिक : निफाड व नाशिक तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसा विण्याबरोबरच नष्ट होवू पाहणाऱ्या द्राक्ष बागांसाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यामागणीसाठी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. गंगापूर धरणात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या पाण्यातून आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर धरणात सध्या ६८ टक्केपाणी साठा असून, दुसरीकडे निफाड व नाशिक तालुक्यांतील डाव्या कालव्यावरील पिंप्री, चित्तेगाव, ओणे, ओझर, दिक्षी, जिव्हाळे, दात्याने, खेरवाडी, कसबे सुकेणे आदि गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा काढावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच द्राक्षबागाही धोक्यात आल्या असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. या सर्व परिस्थितीशी निफाडचे तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून टंचाईचा अहवाल सादर केलेला आहे, तर गावोगावच्या ग्रामपंचायतींनी तसे ठरावही केला आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन तसेच पाटबंधारे राज्यमंत्री शिवतारे यांना परिस्थितीशी अवगत करण्यात येऊन गंगापूर धरणात सध्या शिल्लक असलेल्या साठ्यातून डाव्या कालव्यात आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर या गंगापूर धरणातून पाणी सोडणे शक्य आहे काय याबाबत पाटबंधारे खात्याकडे विचारणा करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवले असून, त्यातील ११० दशलक्ष घनफूट पाणी आजवर सोडण्यात आले, आणखी दोन पर्वण्या आटोपल्यानंतर उर्वरित पाणी आवर्तन म्हणून सोडण्याचा प्रशासन विचार करीत आहे. (प्रतिनिधी)
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: September 09, 2015 12:13 AM