सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत एका कारखानदाराने त्यांच्या कारखान्यातील रसायन व मैलायुक्तपाणी मोकळ्या भूखंडावर सोडल्याने महापालिकेच्या वतीने कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड केला. गेल्या दहा दिवसांत ५१ केसेस करीत सुमारे ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे यांसह इतर तक्रारी मिळून ८००हून अधिक नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे ११ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने (आरोग्य) वतीने सिडको विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ११ दिवसांपासून दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. यात रसायनयुक्त व मैलायुक्त पाणी मोकळ्या भूखंडावर सोडले याबाबत अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखानदारास दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यत आला असून, याबरोबरच रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचरा विलिनीकरण न करणे तसेच प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे आदी तक्रारींबाबत दंडात्मक कारवाईची मोहीम सतत राबविली जाते. गेल्या दि. २९ जुलै ते दि ९ आॅगस्ट २०१९ या कालावधीत सिडको विभागात प्रतिबंधित प्लॅस्टिक वापर करणारे व्यावसायिक यांच्यावर पाच केसेस सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केलेबाबत २८ केसेस, कचरा वर्गीकरण न केलेबाबत ११ जणांवर कारवाई करण्यात आली तर कचरा जाळणे व उघड्यावर लघुशंका करणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदींवर दंडात्मक कारवाई करीत सुमारे ६० हजार रुपयांचा दंड वसूूल करण्यात आला आहे. सदर मोहीम विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत सहभागी स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागुल, आर. आर. जाधव, आर. डी. मते, आर. आर. बोरिसा, आर. एच. रूपवते, स्वच्छता मुकादम दीपक लांडगे, संतोष बागुल, बिरजू गोगलिया, विजय जाधव, राजाराम गायकर आदी सहभागी आहेत.
सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:44 PM