सिडको : महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर करणे यांबाबत परिसरात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात आली असून, यात सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात कॅरीबॅग वापरणाऱ्या आठशेहून अधिक व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत सुमारे १२ लाखांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मोहीम सुरूच असून, यापुढील काळातही प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे मनपा सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे.सिडको विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, विभागीय स्वछता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात रस्त्यावर कचरा टाकणे, प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करणे तसेच कचरा वर्गीकरण, अस्वच्छता याबाबतच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत व्यावसायिकांकडून सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मनपाच्या वतीने सांगण्यात आले.मनपाच्या वतीने दंडात्मक मोहीम सुरू असताना काही व्यावसायिक प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करीत असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आले. यामुळे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी अशा व्यावसायिकांचा सत्कार केला.