स्वच्छ भारत अभियानांतर्गत तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी मनपा पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी पंचवटी विभागात विविध ठिकाणी स्वच्छता कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान पंचवटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करतांना दोन नागरिक आढळून आले त्यांच्यावर कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे दोन हजार रुपये वसूल करण्यात आले. तर एका आईस्क्रिम दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक ग्लास, व कंटेनर इत्यादींचा वापर करताना संबंधित दुकानदार व अन्य एक व्यावसायिक आढळून आले त्यांच्यावर कारवाई करत ५ हजार रुपये या प्रमाणे १० हजार रुपये दंड वसूल केला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान तसेच घरोघर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ओला, सुका, घातक कचरा वर्गीकरणाबाबत आणि परिसरात दैनंदिन फिरणाऱ्या घंटागाड्यांची पाहणी करण्यात आली . संबंधित घंटागाडी सुपरवायझर यांना कचरा वर्गीकरण करण्याबाबत व रस्त्यावर साचलेला कचरा लवकर उचलून परिसरात घंटागाडी रोज सकाळी वेळेत फिरविण्यात यावी अशा सूचना दिल्या.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दीपक चव्हाण, विनय रेवर, बाळू पवार, स्वप्निल चव्हाण, सुखदेव लोंढे, गजेंद्र गोसावी, शेखर साबळे, सुखदेव लोंढे, राकेश साबळे, हिरामण कांबळे उपस्थित होते.