पंचवटी : रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.मंगळवारी (दि. ३०) सकाळी निमाणी परिसर, दिंडोरीनाका या भागात पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्यासह वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेत शंभरहून अधिक बेशिस्त रिक्षाचालक आढळून आले. वाहतूक शाखेने सुमारे १३२ रिक्षाचालकांवर कारवाई करीत सुमारे २७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत रिक्षाचालक उघडपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बहुतांशी रिक्षाचालक हे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना तसेच कागदपत्रे जवळ न बाळगताना आढळून आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक तात्या शेवकर, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, संतोष नवले, बी. एन. खैरनार, गारे, बाविस्कर आदींनी ही कारवाई केली आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:28 AM