शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाही काही लोक सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वागत तोंडावर मास्क न लावता हनुवटीवर अडकविण्यास पसंती देत आहेत, तसेच शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत पिचकाऱ्या मारत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोेलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, सहायक निरीक्षक अतुल पाटील यांच्या पथकाने जोरदार मोहीम राबवून अशा निष्काळजीपणे वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली.
२४ मार्चला पोलिसांनी ३९ लोकांवर मास्क न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून ७,८०० रुपये दंड वसूल केला. बीट मार्शल पोलिसांनी नारायण बापू नगर येथे आठ लोकांना १६०० रुपये असा एकूण ४७ लोकांवर कारवाई करून ९४०० रुपये दंड आकारण्यात आला. २५ लोकांना महापालिकेच्या बिटको रुग्णालयात चाचणीकरिता पाठविण्यात आले. टेस्टिंग किट संपल्याने १० लोकांचीच टेस्ट करण्यात आली. महापालिकेसोबत संयुक्त कारवाईत एकूण २० लोकांवर दंडात्मक कारवाई करून ४ हजारांचा दंड आकारण्यात आला.