नाशिक : जिल्ह्यात एकीकडे सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळत असतानाच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील सातत्याने पाचव्या दिवशी तीन हजारांच्या आसपास रहात आहे. औरंगाबादला पाठवलेल्या अहवालांपैकी हजारहून अधिक अहवाल सातत्याने प्रलंबित राहणे, तसेच पुण्याला जाणाऱ्या अहवालांतूनही निम्मेच अहवाल प्राप्त होत असल्याने अहवाल प्रलंबित राहण्याचे सततचे मोठे प्रमाण नागरिकांसाठी प्रतीक्षेचे तर आरोग्य विभागासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
नाशकात गतत आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले होते; मात्र त्या प्रमाणात कोरोनाचे अहवाल प्राप्त होत नव्हते. त्यामुळे बुधवारपर्यंत कोरोना बाधितांचा अहवाल प्रलंबित राहण्याची संख्या पाच हजारांहून अधिक झाली होती. त्यात औरंगाबादच्या प्रयोगशाळेत सर्वाधिक ैअहवाल प्रलंबित हाेते. आरोग्य यंत्रणादेखील सातत्याने पाठपुरावा करीत असूनही तेथील यंत्रणाच नादुरुस्त झाल्याने अहवाल मिळण्यास चार दिवसांहून अधिक विलंब लागत होता. पुणे, मुंबईहून अहवाल मिळू लागल्यानंतर बाधित संख्येचा आकडा सातत्याने हजार-बाराशेदरम्यान दिसू लागला आहे. मागील चार दिवसात बाधितांच्या संख्येत गत आठवडाभराच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली असल्याने अद्यापही प्रलंबित अहवालांची संख्या २८३३ वर आलेली आहे. दरम्यान पुढील आठवड्यापर्यंत अजूनही बाधित संख्या हजाराच्या वर राहण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे.
इन्फो....
बाधित संख्या वाढल्याने प्रलंबितमध्ये वाढ
आठवड्याच्या प्रारंभी अहवाल बाधित राहण्याचे प्रमाण पाच हजारांवर पोहोचले होते. औरंगाबादची यंत्रणा ठप्प झाल्याने अहवाल खोळंबले होते; मात्र आता तिथे नमुने पाठवणेच बंद करण्यात आले असून, नाशिकसह पुणे, मुंबईलाच नमुने पाठवले जात आहेत; मात्र नमुन्यांची संख्या अधिक झाल्यानेच अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे.
डॉ. अनंत पवार, जिल्हा रुग्णालय.