येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेगलवाडी व शिवयुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक राखी भारतीय सैनिकांनसाठी’ या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्वत: हाताने बनविलेल्या राख्या लष्करी जवानांना बांधून आनंद व्यक्त केला. उपस्थित जवानांचे यावेळी बहिणींच्या आठवणींनी डोळे पाणावले. कार्यक्र मास हवालदार रामदास पोरजे, पॅराशुटर सत्यविर सिंग, बलवान सिंग आदी लष्करी जवानांसह सरपंच उषा आचारी, उपसरपंच रावसाहेब कोठुळे, शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड, मुख्याध्यापक सोमनाथ झोले, पांडुरंग आचारी पहिलवान संदीप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक करतांना शिक्षक ज्ञानदेव सोनवणे यांनी सांगितले की, देशाचे रक्षण करतांना सैनिकांना कुटुंबांपासून तसेच सणोत्सवापासून दूर राहावे लागते. प्रसंगी सिमेचे रक्षण करतांना थंडी, बर्फ, वारा, पाऊस आदींची तमा न बाळगता सेवा बजवावी लागते. सैनिकांचा हा त्याग मोठा असून त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत असेही त्यांनी सांगितले. हवालदार रामदास पोरजे यांनी रक्षाबंधन सण जवानांना घरापासून कोसो दूर असल्याने साजरा करता येत नाही, मात्र शिवयुवा प्रतिष्ठानच्या उपक्र मामुळे या ठिकाणी उणीव भरून निघाल्याचे सांगत भविष्यात मुलांनी पण देशसेवेची इच्छा अंगी बाळगावी असे सांगितले. यावेळी अन्य प्रांतातील जवान सत्यविर सिंग, बलवान सिंग यांची भाषणे झाली. जवानांना राख्या बांधून तसेच गुलाबपुष्प, भेट कार्ड देत राखी पौर्णिमा साजरी केली. यावेळी ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, हमारे देश को सही सलामत रखना’ आदी गीते सादर करण्यात आली. सिमेवरील जवानांसाठी बनविलेल्या राख्याही उपस्थित जवानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उपस्थित जवांनानी त्यांच्या युनिटच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली. सुत्रसंचालन मुक्ता गायकर व आभार सोमनाथ झोले यांनी मानले.
पेगलवाडीच्या चिमुकल्यांनी बांधल्या जवानांना राख्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 7:57 PM