नाशिक : दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून शहरातील दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला असून, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत. महापालिकेने आॅगस्ट २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ७ हजार दिव्यांग आढळून आले होते. महापालिकेकडून दरमहा १५०० ते २००० रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे गरजू दिव्यांगांना त्याचा मोठा आधार लाभणार आहे.महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय घेत त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे, तर सुमारे १४ कोटी रुपये चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिकेने दि. ८ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात दिव्यांगांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले होते तर १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले होते. सर्वेक्षणानंतरही महापालिकेकडे नोंदी होत राहिल्या. त्यामुळे दिव्यांगांची संख्या ७ हजाराच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला असून, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अपंगत्वाच्या टक्केवारीनुसारही पेन्शन देण्याची योजना आहे. वैद्यकीय विभागाने सविस्तर प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यानुसार पुढे महासभेची मंजुरी घेऊन कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पिंपरी चिंचवड, नगरला योजनाराज्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांसाठी पेन्शन योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील सर्वसाधारण सभेने दिव्यांगांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे तर अहमदनगर महापालिकेनेही दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेमार्फतही पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेला सुमारे १ ते १.२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नाशिक महापालिका दिव्यांगांसाठी सुरु करणार पेन्शन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 7:43 PM
प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना : राखीव निधीतून करणार खर्च
ठळक मुद्देमहापालिकेने आॅगस्ट २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ७ हजार दिव्यांग आढळून आले होतेमहापालिकेकडून दरमहा १५०० ते २००० रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे