सातपूर : ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे समन्वयक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सद्य:स्थितीत ४० टक्के पेन्शनधारकांना एक हजार रु पयांच्या आत पेन्शन मिळत आहे. या तुटपुंज्या पेन्शनवर कशीबशी गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे कोशियारा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, साडेसात हजार पेन्शन लागू करावी, तोपर्यंत पाच हजार पेन्शन देण्यात यावी, पीएफ कार्यालयाने दि. ३१ मे २०१७चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, २००८ची बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन नाशिक विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अश्रफ यांना देण्यात आले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली, तर या मागण्यांचे निवेदन मुख्यालयाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अश्रफ यांनी शिष्टमंडळाला दिले. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील संघटनेचे नारायण होन, देवीसिंग जाधव, लालसिंग पाटील, संपत समिधर, प्रशांत संत, सुखदेव अहेर, सुखदेव आंधळे, भाऊसाहेब सोनवणे, एम. आर. सूर्यवंशी, अविनाश क्षीरसागर आदींसह पदाधिकारी आणि पेन्शनर्स उपस्थित होते. प्रारंभी सुभाष पोखरकर, नारायण होन, देवीसिंग जाधव, लालसिंग पाटील, संपत समिधर, प्रशांत संत आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून आंदोलनाची रूपरेषा विशद केली.
पेन्शनर्स संघटना ; ईपीएस संघर्ष समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:27 AM