नाशिक : गोदावरीसह अन्य नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठ्यांना दिले असले तरी, पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कोणतीही तरतूद शासन दरबारी नसल्याने नुकसानग्रस्त वाऱ्यावर सोडले जाण्याची शक्यता अधिक आहे. मंगळवारी नाशिक शहरातील गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नद्यांना पूर येऊन जनसंपर्क तुटण्याबरोबरच, नदी व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या वस्तीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मल्हारखाण झोपडपट्टी, सराफ बाजार, बालाजी कोट, रोकडोबा घाट, नाव दरवाजा, मोदकेश्वर, दहीपूल, कानडे मारुती लेन, शिवाजी वाडी, बजरंगवाडी, आरटीओ कॉलनी, रामकुंड परिसर, कथडा, गणेशवाडी, तपोवनरोड, नागचौक, गंगावाडी परिसर तसेच उंटवाडी, कांबळेवाडी आदि भागात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारपयोगी साहित्य वाहून गेले, तर दुकानदारांनाही मोठी झळ सोसावी लागली. नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही नदी, नाल्यांना आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. याशिवाय बंधारे फूटून शेतात पाणी शिरल्याचे तर पिके वाहून गेल्याच्याही तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना आदेश देऊन पंचनामे करण्याची सूचना केली आहे. परंतु पुरात झालेल्या वित्तहानीची नुकसानभरपाई देण्याची कोणतीही तरतूद आपत्ती व्यवस्थापन वा मदत, पुनर्वसन कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलाठ्यांनी पंचनामे केले तरी, त्याची भरपाई पूरग्रस्तांना मिळेलच याची कोणतीही शाश्वती प्रशासन देत नाही.
पंचनाम्याचे आदेश, मदतीचे काय?
By admin | Published: August 04, 2016 2:05 AM