लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभेची उमेदवारी करण्यापूर्वी प्रत्येक समाजाच्या घटकाशी चर्चा केली, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतकांनी उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला व राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारापेक्षाही पहिल्या दिवसापासून आपण प्रचारात आघाडी घेतल्यामुळे आपली उमेदवारी शेवटपर्यंत चर्चेत राहिली. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मिळालेली मते पाहता, ज्या मतदारांच्या भरवशावर आपण उमेदवारी केली. त्यांनी आपला विश्वासघात केला की, देशभर ज्या ईव्हीएमबाबत संशय घेतला जात आहे, त्याने दगा दिला? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही, अशी भावना व्यक्त करून माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल मान्य करण्यास नकार दिला. मात्र असे असले तरी, सिन्नर विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कोकाटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले संपूर्ण निवडणूक प्रचारात आपल्याला कोठेही ‘पेड’ प्रचार करावा लागला नाही, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध समाजघटकांकडून मिळणारा पाठिंबा व स्वखर्चाने हितचिंतकांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला एक लाख ३५ हजार मते मिळाली असली तरी, केलेल्या प्रयत्नांपेक्षाही ती कमी आहेत. ती कमी का झाली? या प्रश्नाचे उत्तर आपण पहिल्या दिवसांपासून शोधत आहोत. त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नसल्यामुळे लोकसभेचा निकाल मान्य करण्यास मन तयार होत नसल्याचे कोकाटे यांनी सांगितले. राज्यात व देशात सरकारच्या विरोधात अॅण्टी इन्कबन्सी असताना निवडणुकीत मते घटण्याऐवजी त्यात वाढ झाल्याचा निकाल धक्कादायक व संशय घेण्याजोगा आहे. आपण स्वत: तीन वेळा आमदार असताना जनतेची कामे करूनही प्रत्येक निवडणुकीत आपले मताधिक्क्य घटत गेले ही वस्तुस्थिती आहे, अशा परिस्थितीत विद्यमान उमेदवाराचे मताधिक्क्य कसे वाढू शकते, असा प्रश्नही कोकाटे यांनी केला. सन २०१४ मध्ये केंद्रात भाजपाला सत्ता आल्यानंतर देशभर जो उत्साह दिसला तो यावेळी भाजपाच्या जागा वाढूनही का दिसला नाही, असा सवाल करून देशपातळीवर ईव्हीएमबाबत संभ्रम व संशय घेतला जात असल्यामुळे आता सरकारही स्थिरस्थावर झाल्याने त्यांनी देशभरातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी या सर्व बाबींची चौकशी करावी व जनभावनेचा विचार करून यापुढील निवडणुका बॅलेट पेपरने घ्याव्यात, अशी मागणी करून कोकाटे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघात बॅलेट पेपरने मतदान घेतले जावे, त्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च आपण उचलण्यास तयार असल्याचेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे उपस्थित होत्या.