दिव्यांग बांधवांना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र काढणे गरजेचे असल्याने त्यांना महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दिव्यांग केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे पूर्वी प्रमाणपत्र मिळायचे; मात्र गेल्या काही महिन्यांपासून दिव्यांग बांधवांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. जाकीर हुसेन रुग्णालयातून दिले जाणारे प्रमाणपत्र देण्याचे काम कोरोना कारणास्तव बंद केल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी अन्य रुग्णालयात पाठविले जाऊन हेळसांड केली जाते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक केली असली तरी कोरोना कालावधीत त्या अधिकाऱ्यांकडे कोरोना कामाची जबाबदारी दिल्याने त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दिव्यांग बांधवांची हेळसांड थांबवावी यासाठी नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, दिलीप पाटील, संजय तिडवे, राहुल जाधव, छाया चौधरी, संगीता जाधव, आदींनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी घालावे लागताहेत खेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:18 AM