पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार बाजारसमिती सिग्नलवर शनिवारी पहाटेच्या सुमारास मालट्रक व आयशर या दोन मालवाहू वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या घटनेत एका वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी धाव घेतली. रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मध्यरात्रीच्या सुमाराला मिठाने भरलेला आयशर व साखर वाहून नेणारा ट्रक यांच्यात बाजार समिती चौफुली सिग्नलवर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. रस्त्यावर मीठ, साखरेचा खच पडलेला असताना परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीतील काही महाभागांनी अपघातानंतर वाहनांत असलेल्या साखरेवर डल्ला मारल्याची चर्चा आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मीठ गोण्या भरून तारवाला नगरकडून पेठरोडला जाणारा आयशर (क्रमांक एम. एच. ४८, बी. एम.२०६७) हा सिग्नलवरून पेठरोडकडे डाव्या बाजूला वळण घेत असताना पेठरोडकडून गुजरातच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकवर (एम. एच. १६, सीसी ७४९५) जाऊन आदळला. त्यानंतर दोन्ही वाहने चौफुलीवर उलटली. त्यातील मीठ व साखर गोण्या रस्त्यावर पडल्या होत्या. रस्त्याच्या मध्यभागीच अपघात झाल्याने सकाळच्या सुमाराला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहतूक कोंडी मोकळी केली. अपघातात बीड जिल्ह्यातील वाहन चालक सचिन अशोक वनवे हा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
---इन्फो बॉक्स---
...तर अपघात टळला असता
बाजारसमिती चौफुलीवर प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारवालानगरकडून सिग्नल क्रॉस करत मखमलाबाद रोडकडे जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावरचा एक सिग्नलच गायब झाला आहे. तारवालानगरकडून बाजारसमिती चौफुलीवर आल्यानंतर समोरच्या बाजूला सिग्नलच दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता चौफुली नसून एकेरी असल्याचे निदर्शनास येते व चौफुलीवरून वाहन नेताना अचानकपणे समोरून वाहने येतात आणि त्यातून अपघात घडतात. जर या चौफुलीवर सिग्नल असता तर कदाचित अपघात टळला असता.
100721\10nsk_6_10072021_13.jpg
पंचवटी अपघात