नाशिक : कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या पुणे, मुंबई येथील अनेक नागरिक नाशिकमध्ये शिरले असून, शहरातील आपल्या नातेवाइकांकडे त्यांचे खुलेआम वास्तव्य आहे. शहरातही त्यांचा वावर वाढला असताना अशा घुसखोरांना रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर आरोग्य कर्मचारी येऊन माहिती घेऊन जातात, परंतु त्यांची आरोग्य तपासणी करीत नसल्याने पालिकेचा आरोग्य विभाग केवळ सोपस्कार पूर्ण करीत असल्याचे दिसून येते.पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले असल्याने या दोन्ही शहरांतील नागरिकांवर अनेक निर्बंध आहेत. असे असतानाही प्रशासनाला खोटी माहिती देऊन पुणे-मुंबईतील लोक नाशिकमध्ये शिरकावर करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत तर पुणे, मुंबईच्या अनेक गाड्या नाशिकच्या रस्त्यावर दिसून आल्या. नाशिकमध्ये शिरलेल्या या नागरिकांची जागरूक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेचे पथक चार ते पाच तासांनी दाखल होते. त्यानंतर संबंधितांनी दिलेली माहिती खरी आहे असे समजून घेत नर्सेस निघून जातात. मात्र त्यानंतर संबंधितांची पथकाकडून कोणतीही चौकशी केली जात नसल्याने असे लोक नाशिककरांच्या संपर्कात येत आहेत. संबंधितांना घराबाहेर न पडण्याची ताकीद देऊनही विनामास्क असे लोक इमारतीमध्ये वावरत असल्याने स्थानिक नागरिकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. पथक येऊन गेल्यानंतरही संबंधितांकडे आलेली व्यक्ती सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत नसल्याचे आरोग्य विभागाला कळविल्यानंतर ते पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत.संपूर्ण नाशिक जिल्हा कोरोनाशी लढा देत असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ज्या यंत्रणांकडे जबाबदारी आहे त्यांच्याकडून मात्र याप्रकरणाचे फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा अनुभव येत आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर तेथील कर्मचारी नकारात्मक मानसिकतेने असे लोक येणारच म्हणून कार्यवाही करण्याचे टाळत असल्याचा अनुभव तक्रारकर्त्यांना आला आहे. वैद्यकीय पथकही केवळ माहितीचे अर्ज भरून घेऊन निघून जातात, परंतु नंतर संबंधित व्यक्ती कुठे फिरत आहे, घरातच आहे का? याची कोणतीही खबरदारी घेत नसल्याने यंत्रणेकडून मिळणाऱ्या शिथिलतेने नाशिककर मात्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.-------------------------गांभीर्य नसल्याने भीतीकोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी असणाºया यंत्रणांकडून आता फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. इमारतीमध्ये येणाºया पुणे-मुंबईच्या नागरिकांची तपासणी होत नाहीच शिवाय त्यांच्या हातावरील शिक्के पुसले जात आहे. आरोग्य यंत्रणेच्या दप्तरी शिक्केमारल्याचे असले तरी प्रत्यक्षात मात्र संबंधित शिक्के पुसून शहरात वावरत आहेत.
मुंबई, पुण्याहून आलेल्यांचा शहरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:07 PM