पेठ : उन्हाळ्याच्या प्रारंभीच सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, पेठ तालुक्यातील नद्या, नाले कोरडे पडू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा प्रश्न लक्षात घेऊन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व रोटरी क्लब आॅफ नाशिक यांनी संयुक्तरीत्या पुढाकार घेऊन शिवशेतांबे गावानजीक बंधारा बांधून पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवशेतांबेची लोकसंख्या जवळपास पाच हजार असून, याच गावातील शासकीय आश्रमशाळेत सातशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पाणी अडवण्याची कोणतीही योजना नसल्याने मार्चनंतर गावाला पाणीटंचाईचे चटके जाणवतात. कृषी अधिकारी शीलानाथ पवार यांच्या संकल्पनेतून बंधारा बांधण्याचा विचार पुढे आला. रोटरी क्लबच्या मध्यस्थीने महिंद्रा कंपनीच्या सीआर फंडातून गावासाठी १५ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात येणार असून, गावाचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. महिंद्रा कंपनीचे व्ही. आर. रामकुमार, संजय लिंगायत, आश्विन पाटील, सुनील सावंत, प्रदीप देशमुख, शेळके, लहुदास गायकवाड, नामदेव गायकवाड, भारत माळगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशेतांबेवासीयांचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:10 AM