नाशिक : शासकीय हिशेबानुसार पावसाळा संपायला केवळ नऊ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील पेठ, मालेगाव, नांदगाव व देवळा या चार तालुक्यांनी पर्जन्याच्या टक्केवारीत शंभरी पार केली असून, अकरा तालुके सरासरीपर्यंतदेखील पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तीन तालुक्यात अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्याच्या टक्केवारीची शंभरी गाठलेल्या पेठ (१००.१२), मालेगाव (११६.०४), नांदगाव १३४.७४) व देवळा (१०२.९१) या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, ११ तालुके पर्जन्याची शंभरीही गाठू शकले नाहीत. त्यात नाशिक (५३.२४), इगतपुरी (९८.७६), दिंडोरी (६८.१७), त्र्यंबकेश्वर (७३.७९), चांदवड (४७.५९), कळवण (७३.१७), बागलाण (८६.८७), सुरगाणा (९८.८८), निफाड (९८.८०), सिन्नर (६६.०५) व येवला (८९.११) या तालुक्यांचा समावेश आहे. यंदा पावसाळा सुरु होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार पावसाळा वेळेवर सुरु झाला. त्या पावसाच्या हजेरीवर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र, त्यानंतर पावसाने बरीच ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावलीे नाही. त्यामुळे केवळ पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तीन तालुक्यांव्यतिरिक्त बारा तालुक्यात मागील वर्षाइतकाही पाऊस झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात (२०४५.६ मि. मी.) तर सर्वात कमी (२५२ मि. मी.) पावसाची नोंद झालेली आहे.
इन्फो...
धरणांनी गाठली शंभरी
यंदा जिल्ह्यातील वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या व माणिकपुंज आठ धरणांनी टक्केवारीची शंभरी गाठली आहे. ओझरखेड (४७), तीसगाव (३१) व भोजापूर (४८) ही तीन धरणे पन्नाशीही गाठू शकले नाहीत. आतापर्यंत वाघाडमधून ११ क्युसेक, भावलीतून ५५० क्युसेक, मुकणेतून ७३ क्युसेक, वालदेवीतून १८३ क्युसेक, चणकामधून २२० क्युसेक, हरणबारीतून १३२ क्युसेक, तर नागासाक्यातून २१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.