नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराला रविवारी (दि.१९) सायंकाळी पूर्णविराम मिळाला. रविवारचा सुटीचा दिवस असल्याने दिवसभर उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारांना आवाहन केले. त्यामुळे गल्लीबोळात विविध राजकीय पक्षांचे झेंडे आणि उमेदवारांच्या निशाण्यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले. महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण १४०७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. ३१ प्रभागांतील १२२ जागांकरिता ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाच्या पूर्वी ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रभागांमध्ये प्रचारफेऱ्या काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, कॉँग्रेस, माकपा, बसपा, भाकप, ए.आय.एम.आय.एम., समाजवादी पार्टी, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले), रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर), धर्मराज्य पक्ष, आंबेडकरराइट पार्टी आॅफ इंडिया, संभाजी ब्रिगेड, भारतीय संग्राम परिषद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय जनहित कॉँग्रेस पार्टी आणि अपक्षांचा समावेश होता.
जाहीर प्रचाराला पूर्णविराम !
By admin | Published: February 20, 2017 12:37 AM