नाशिक : महिलांनी बनविलेल्या दर्जेदार उत्पादनामुळे त्यांच्यातील कौशल्य विकसित तर होतेच शिवाय त्यांच्यातील प्रतिभेला चालना मिळून त्यांना विकासाचा मार्गदेखील मिळू शकतो. बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत आयोजित ‘गोदाई’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी भुसे बोलत होते. डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपायुक्त पारस बोथा आदि उपस्थित होते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी असते; परंतु याबाबतचे मार्केटिंग व्यवस्थित होत नसल्याने दर्जेदार मालालाही अपेक्षित किंमत मिळत नाही. त्यामुळेच महिला बनवित असलेली उत्पादने, नवनवीन वस्तू व उपक्रमांना शासनातर्फे प्रोत्साहन दिले जाते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका, जिल्हा पातळीवर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल. बचतगटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, अशी शासनाची भूमिका असल्याचेही भुसे यावेळी म्हणाले. यावेळी विविध खात्यांतील अधिकारी, स्वयंसेवी संस्था, बचतगटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चार जिल्ह्यांतील बचतगट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी
By admin | Published: February 15, 2015 1:04 AM