नाशिक : आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असल्याने स्थायी समितीवर रिक्त झालेल्या दोन जागांवर आपली वर्णी लागण्यासाठी मनसेत इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, स्थायीवरील विद्यमान सदस्य यशवंत निकुळे यांच्याबाबतीत वेगळा न्याय लावला जात असल्याने धुसफूसही पहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मनसेत फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थायी समितीवर सत्ताधारी मनसेने सर्व सदस्यांना संधी मिळावी याकरिता एक वर्षाच्या कालावधीपुरता नियुक्ती दिली. गेल्या तीन वर्षांपासून मनसेकडून त्याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. आताही सुरेखा भोसले आणि मेघा साळवे यांच्याकडून राजीनामे घेण्यात आले असून, त्यांच्या रिक्त जागांवर येत्या बुधवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेत दोन नवीन सदस्यांची नियुक्ती महापौर घोषित करणार आहेत. या दोन सदस्यांपैकी अर्चना जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे, तर दुसऱ्या जागेसाठी डॉ. विशाल घोलप, शिक्षण समितीचे उपसभापती गणेश चव्हाण, सुजाता डेरे यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय, महापालिकेच्या निवडणुकीला अवघे आठ महिने उरल्याने स्थायीचे सदस्यत्व पदरात पाडून घेण्यासाठी काही इच्छुक नगरसेवकांनीही प्रयत्न चालविले असून, अन्यथा पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला असल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने, मनसेने दोन सदस्यांचे राजीनामे घेताना यशवंत निकुळे यांचा मात्र राजीनामा न घेतल्याने पक्षात धुसफूस पहायला मिळत आहे. मागील वर्षी सविता काळे यांनी राजीनामा देण्यास विलंब लावला त्यावेळी त्यांच्याविरुद्ध कारवाईची भाषा करणाऱ्या मनसेने यशवंत निकुळे यांना मात्र एक वर्षाचा कालावधी संपूनही दुसऱ्या वर्षाची बक्षिसी देण्याचा घाट घातल्याने स्थानिक नेतृत्वाबाबत नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकुळे यांच्याबाबतीत वेगळा न्याय लावला जात असल्याने पक्षातील काही नगरसेवकांनी संपर्कप्रमुखांकडेही तक्रारी केल्याचे वृत्त आहे. पदे दोन आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे, तर यापूर्वी स्थायीवर गेलेल्या सदस्यांनीही पुन्हा एकदा सदस्यत्वासाठी इच्छा प्रदर्शित केली असल्याचे समजते.
‘स्थायी’च्या रिक्त जागा; मनसेत धुसफूस
By admin | Published: July 19, 2016 1:23 AM