श्याम बागुल /नाशिक: दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी अवघा दीड महिन्याचा कालावधी बाकी असून, गणेशोत्सव मंडळांनी कार्यकारिणी निवडून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारण्यास महापालिका व पोलिसांची परवानगी सक्तीची केली असून, मंडळांनी एक महिन्यापूर्वीच त्यासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरवर्षी शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी महिना, दीड महिन्यापूर्वीपासूनच तयारी केली जाते. शहरात जवळपास एक हजाराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे मोठे मंडळे असून, छोट्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या पाच हजाराच्या आसपास आहे. शिवाय घरोघरी देखील गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाचे दहा दिवस भारावलेले असतात. त्या निमित्ताने शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील दरवर्षी होत असते. सार्वजनिक मित्र मंडळांनी त्या दृष्टीने बैठका घेण्यास सुरुवात केली असून, कार्यकारिणीची निवड, गणेश मूर्तीची निवड, आरासाची रूपरेषा ठरविली जात आहे. काही मंडळांनी वर्गणीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
गणेशाची प्रतिष्ठापणा करणाऱ्या सार्वजनिक मित्र मंडळांच्या जागा निश्चित असल्या तरी, त्यामुळे रहदारीस अडथळा ठरू नये तसेच मंडपाचा आकार देखील बेताचाच असावा असा आग्रह प्रशासनाचा असतो. त्यामुळे यंदाही पोलिस व महापालिकेची परवानगी मंडप उभारण्यास सक्तीची करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर विभागाकडून त्यासाठी परवानगी देण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.