नाशिक - शहरातील काही वृक्ष धोकादायक असल्याचे सांगत ते तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले जातात परंतु, ब-याचदा पाहणी दरम्यान सदर वृक्ष धोकेदायक नसल्याचे आढळून येते. त्यामुळे, यापुढे धोकादायक वृक्षांसंदर्भात पाहणी अहवालात पूर्ण कारणमीमांसा केल्यानंतरच वृक्षतोडीस परवानगी देण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, काही धोकादायक वृक्ष तोडण्यासंबंधीचे प्रस्ताव समितीपुढे मांडण्यात आले तर काही वृक्ष धोकादायक नसल्याने ते तोडण्याची गरज नसल्याचेही प्रस्ताव ठेवण्यात आले. विभागीय अधिका-यांमार्फत ब-याचदा प्राप्त तक्रारीनुसार धोकादायक वृक्ष तोडण्यासंबंधीचे प्रस्ताव समितीकडे पाठविले जातात. परंतु, प्रत्यक्ष पाहणी अहवालात तक्रारीत तथ्य आढळून येत नाही. त्यामुळे, यापुढे पाहणी अहवालात धोकादायक वृक्षतोडीसंबंधी त्याची पूर्ण कारणमीमांसा केल्याशिवाय प्रस्ताव ठेवण्यात येऊ नये. कारणमीमांसा नसलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे यावेळी ठरविण्यात आले. दरम्यान, काही वृक्षतोडीचे प्रस्तावाबाबत फेरपाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६ मधील इच्छापूर्ती फूडस उपनगर येथील एक रेनट्री धोकादायक स्थितीत वाटत नसल्याने तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सदर वृक्षाच्या मुळ्यांमुळे पेव्हर ब्लॉक वर आल्याने ते काढून बुंध्याभोवती चबुतरा बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, समितीने चबुतरा बांधण्यास परवानगी नाकारली. यावेळी काही वृक्षांच्या फांद्यांचा विस्तार कमी करण्यासही मान्यता देण्यात आली. दरम्यान, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग स्वतंत्र करण्याची मागणी सदस्यांनी केली असता सद्यस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ पाहता ते शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, प्रभारी उद्यान अधिक्षक रौंदळ, सदस्य मच्छिंद्र सानप, श्याम साबळे, आशा तडवी, शेखर गायकवाड, योगेश निसाळ, संदीप भवर आदी उपस्थित होते.नारळ वृक्षांभोवती जाळ्या लावासमितीच्या बैठकीत काही धोकेदायक नारळ वृक्ष तोडण्यासंबंधीचेही प्रस्ताव ठेवण्यात आले होते. परंतु, धोकेदायक नसतानाही काही वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, सदर वृक्ष तोडण्याऐवजी वरती नारळाभोवती जाळ्या लावण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे नारळ खाली पडून कुणाला इजा होणार नाही.
नाशकात कारणमीमांसा केल्यानंतरच धोकादायक वृक्षतोडीस मिळणार परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:20 PM
वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय : काही वृक्षांची परवानगी नाकारली
ठळक मुद्दे ब-याचदा पाहणी दरम्यान सदर वृक्ष धोकेदायक नसल्याचे आढळून येतेकाही वृक्षतोडीचे प्रस्तावाबाबत फेरपाहणी करण्याच्या सूचना