नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खते व बियाणे विक्रीची परवानगी घेतलेल्या जागेवर चक्क दारूविक्रीचा प्रकार घोटी गावातील रेल्वेफाटक परिसरात सर्रास सुरू असल्याचा प्रकार बुधवारी (दि.१६) उघडकीस आला. दुसरी घटना घोटीतच ग्रामपंचायतीची परवानगी न घेता परस्पर पोेटभाडेकरू ठेवून खतांची विक्री सुरू असल्याचेही उघड झाले. कृषी विभागाशी संपर्क साधला असता अधिकाºयांनी चूक झाल्याचे कबूल केले आहे. कृषी सभापती नयना रमेश गावित यांच्याच तालुक्यात हा प्रकार आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घोटी ग्रामपंचायतीच्या तेली गल्ली भंडारदरा रोडवरील दुर्गा कॉम्प्लेक्समध्ये एका कृषी सेवा केंद्राने खते व बियाणे विक्रीचा परवाना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून काही दिवसांपूर्वीच घेतल्याचे समजते. सुरुवातीला या ठिकाणी खते व बियाणे विक्री सुरू होती. मात्र नवीन निर्णयामुळे महामार्गावरील दारूविक्री दुकानांवर बंदी आल्याने एक दारू दुकान चक्क या खते व बियाणे विक्रीच्या जागी दुर्गा कॉम्प्लेक्समध्ये थाटण्यात आले. प्रत्यक्षात या जागा स्थलांतराची व खते व बियाणे विक्री केंद्राची जागा बदलल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला कळविण्यात आले नाही. तसेच ज्या नवीन जागी हे कृषी सेवा केंद्र स्थलांतरित झाले, ती जागा खते व बियाण्यांचा परवाना घेतेवेळी गुदाम म्हणून दाखविण्यात आली होती. त्या गुदामाच्या जागेवर चक्क कृषी सेवा केंद्र सुरू करून खतांची विक्री व खतांच्या विक्रीच्या जागी मद्य विक्री सर्रास सुरू असल्याचे बुधवारी (दि.१६) आढळून आले. याप्रकरणी कृषी विभागाचे भरारी पथक आणि तालुका कृषी अधिकारी नेमके काय काम करतात? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता सुरुवातीला अधिकाºयांनी माहिती नसल्याचे सांगितले. नंतर मात्र याप्रकरणात चूक झाल्याची कबुली दिली आहे. या दुकानदारावर आता कारवाईची शक्यता आहे.दाखल्यातही फेरफारचा प्रताप घोटी ग्रामपंचायतीने नारायणसिंग साबळे यांना घर क्रमांक ३६२५ वरील गाळा नं. १ ते ८ मध्ये साई-विश्व अॅग्रो ट्रेडर्स नावाने खते व बियाणे विक्रीसाठी ना हरकत दाखला २८ आॅक्टोबर २०१६ रोजी दिला होता. या दाखल्यात फेरफार करून त्याच तारखेचा दुसरा दाखला तयार करण्यात येऊन घोटी ग्रामपंचायतीच्या मालकीचे ४८३/१अ/१ मधील बहुद्देशीय शॉपिंग सेंटर गाळा नं ५ मध्ये साई-विश्व अॅग्रो ट्रेडर्स नावाने खते व बियाणे विक्रीस परवानगी दिल्याचा दाखला तयार करण्यात आला आहे. या प्रकरणात कृषी विभागासह घोटी ग्रामपंचायतीचीही दिशाभूल करण्यात आल्याचे समजते.
परवानगी खतांची, विक्री मद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:58 PM