येवला : विम्याच्या रकमेसाठी तालुक्यातील महालखेडा येथील विधवा महिलेचा छळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालखेडा येथील मनीषा संजय नागरे (३६) या विधवा महिलेस पतीच्या निधनानंतर मिळणारे विम्याचे पैसे व पीएफचे दहा लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम आपणास मिळावी यासाठी सासरच्या मंडळींनी मनीषाला मारहाण करून तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात बेशुद्ध झालेली मनीषाला मृत समजून सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिनेदेखील काढून घेत स्वतःच्या कारमधून भिंगारे रोडच्या कडेला टाकून दिले.
मनीषाच्या माहेरच्या मंडळींना या घटनेची माहिती कळताच त्यांनी बेशुद्धावस्थेतील मनीषाला येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मनीषा नागरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत दीर सुनील नामदेव नागरे, सासू जनाबाई नामदेव नागरे, जाव वंदना सुनील नागरे, मुलगा समर्थ संजय नागरे आणि वाहनचालक सुनील म्हसू जाधव यांच्या विरुध्द भा.दं.वि. ३०७, ३२७, ४९८, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.