येवला : आज जे हिंदू राष्ट्र म्हणून मागणी पुढे येते आहे ती छत्रपतींनी रयतेसाठी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य नव्हे, तर हा हिंदू राष्ट्राची मागणी हा पेशवाई आणण्यासाठी असलेला डाव आहे. ज्या पेशवाईत जातीय उच्च निचता शिगेला पोहोचली होती, ज्या मनुवादावर पेशवाई आधारलेली होती ती मनुस्मृती जाळण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केले. महात्मा फुले नाट्यगृहात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीनिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे होते. व्यासपीठावर माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, सुशील गुजराथी, सुभाष पाटोळे, अॅड. दिलीप कुलकर्णी, विठ्ठल शिंदे, महेंद्र पगारे, सुदाम पडवळ, संजय पगारे, प्रा. अजय विभांडिक, सलीम काझी, डॉ. भाऊसाहेब गमे उपस्थित होते. ‘बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज आणि धर्मनिरपेक्षता’ या विषयावर वागळे पुढे म्हणाले, या भारतात आज काही लोकांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ असे वाटू लागला आहे. एकच धर्म जर तुम्हाला हवा असेल तर उरलेल्या इतर सर्वधर्मियांना तुम्ही ठार मारणार का? असे धार्मिक वितंडवाद तुम्हाला हवा आहे आहे का ? हा भारत तुम्हाला हिंदूंचा पाकिस्तान बनवायचा आहे का असे प्रश्नही वागळे यांनी यावेळी उपस्थित केले. भारत स्वतंत्र झाला त्याच वेळी भारताने ठरवून टाकले होते की भारत एक धर्मीय राष्ट्र होणार नाही. धर्मनिरपेक्ष याचा अर्थ युरोपात असलेला सेक्युलर समाज नव्हे. युरोपातील सेक्युलर समाजात धर्माला कुठलेच स्थान नसते मात्र भारताचा सेक्युलर वाद हा सर्व धर्माचे सहजीवन असणारा धार्मिक समाज असल्याचे वागळे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवरायांचे हिंदवी स्वराज्य, त्यांना अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर तसेच पुण्यातील आयटीमध्ये काम करणाºया युवकाची हत्त्या अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. प्रास्तविकात समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी छत्रपतींचा खरा इतिहास डोक्यात घेऊन स्वयंसिद्ध स्वतंत्र विचारांची युवक व युवतींची फळी उभी राहावी हा व्याख्यानाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. परिचय भागवत सोनवणे यांनी केला. ‘राजे शिवछत्रपती‘ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या,प्रथम तीन विद्यार्थिनी,अन्सारी आयमन इद्रीस, सुमैय्या अबीद शहा, अन्सारी मंताशाबानो सगीर यांना संविधानाची प्रत, मलालाचे आत्मचरित्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी अॅड. शिंदे यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचलन दत्ता महाले यांनी तर आभार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी मानले. आजवर या देशात धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या गेल्या पण भीमा कोरेगाव ला 1 जानेवारी ला झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वात मोठा असलेल्या समाजात आण िडॉ.बाबासाहेब यांच्या अनुयायात दंगल घडवून दोन्ही समाज कायमचे कसे दुभंगले जाईल आण ित्यातून राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल याचा डाव मनुवादी शक्तींनी रचला. मनुवादी शक्ती या केवळ एका जातीपुरत्या मर्यादित नसून बहुजन समाजातही ही वृत्ती भरली आहे. माझाच वर्ण श्रेष्ठ म्हणून म्हणून हिटलरने ६० लाख ज्यू ना विषारी वायू देऊन ठार मारले,ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे भौगिलीकदृष्ट्या मोठे नसेलही, पण जगाला आदर्शवत असे सर्वधर्म समभाव असलेले राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरोगामीत्व ओळखले नाही तर पुन्हा एकदा पेशवाई आणि मनुवाद फोफाळेल, इतकंच नाही तर पुन्हा एकदा सती जाण्याची किंवा केशवपन करण्याची प्रथा रूढ होईल. मनुवादी इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण प्रतिपालक म्हणून रंगवले. खोट्या इतिहासकारांना मनोरंजनाच्या पलीकडे मानू नये.
हिंदू राष्टच्या मागणीमागे पेशवाई आणण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:28 AM