रामदास शिंदेपेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व दोन्ही राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील औद्योगिक दळणवळणासाठी महत्वाचा असलेला नाशिक- पेठ - पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग पेठ शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने शहरात होणारी वाहतुकीची कोंडी सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.पेठ शहराची लोकसंख्या वाढू लागली तसतशी व्यावसायिक दुकानांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. त्यात शहराचा विस्तार झाला असला तरी व्यावसायिकदृष्टया शहरातून जाणारा बलसाड रस्ता ही एकमेव बाजारपेठ असल्याने स्थानिक सह आजूबाजूच्या खेड्यावरून येऊन व्यवसाय करणाऱ्यांनी याच रस्त्यालगत दुकाने थाटल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा निवासी घरे, त्यापुढे व्यावसायिक दुकान व दुकानासमोर रस्त्यावर वाहनांची पार्कींग यामुळे वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. या रस्त्यावरून मोठया प्रमाणावर अवजड वाहने ये जा करत असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर किमान तास दोन तास वाहतुकीची कोंडी होत असते. शिवाय याच रस्त्यावर पंचायत समिती, ग्रामीण रु ग्णालय विविध बँका व सार्वजनिक कार्यालये असल्याने शासकिय कामासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होतांना दिसून येते. पेठ शहरात प्रवेश करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर टपऱ्यांचे दर्शन घडते. गावात व्यावसायिकांनी केलेले अतिक्र मण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.बायपासचा प्रस्ताव लालफितीत गत दोन वर्षापासून नाशिक ते गुजरात रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरू असून पेठ शहराच्या दोन्ही बाजूला जवळपास काम पुर्ण होत आले असले तरी शहरात अजून कामाला सुरु वात करण्यात आलेली नाही. सदरचा रस्ता गावातून जाणार की शहराच्या बाहेरून जाणार याबाबत पेठवासियांमध्ये संभ्रमावस्था आहे. अनेक वेळा अतिक्र मणधारकांना नोटीसा दिल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याने नेमका रस्ता गावातून जातो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पेठ शहरातील वाहतुकीची कोंडी ठरतेय डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 9:57 PM