पंचवटी : पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या मागे असलेल्या अष्टविनायकनगर तसेच समर्थनगर परिसरातील नागरी वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे केवळ खडीकरण करण्यात आले आहे. मात्र डांबरीकरण कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही तसेच नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर पथदीप नसल्याने सदर रस्त्याबाबत व पथदीपाबाबत मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या भागात राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत शेकडो नागरिक राहतात. महापालिका प्रशासनाच्या वतीने समर्थनगर तसेच अष्टविनायकनगर या भागात रस्त्यावर खडीकरण केले आहे. मात्र डांबरीकरण न झाल्याने रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने याबाबत तक्रार कोणाकडे करावी, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरात अनेक इमारतींचे काम सुरू असून, बांधकामाचे साहित्य येणाºया वाहनांचीदेखील कायम वर्दळ राहते त्यामुळे खडीकरण केलेल्या रस्त्याची आणखीन दुरवस्था झाली आहे. बांधकाम साहित्य वाहतूक करणाºया अवजड वाहनामुळे अनेकदा नळजोडण्यांना गळती लागते.महापालिका प्रशासनाने तसेच प्रभागाच्या नगरसेवकांनी या रस्त्याची तत्काळ पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच पथदीप बसविणेबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरात राहणाºया महेश शेळके, रोशन अहिरे, बाळासाहेब मुर्तडक, गणेश हेकड, पांडुरंग चोथे, सचिन सातपुते आदींसह समर्थनगर, अनुसयानगर, अष्टविनायकनगर भागात राहणाºया नागरिकांनी केली आहे.
पेठरोड अष्टविनायकनगर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:12 PM