नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात अल्पशी वाढ दिसून येत असताना पेठ तालुका गत महिन्याप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे, तर सुरगाण्यात केवळ एकमेव रुग्णाची नोंद असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दिलासादायक बाब आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९४ हजार ८४६ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत, तर सद्य:स्थितीत २ हजार ७६२ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीण ६६१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८९९ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हाबाहेरील ४२ अशा एकूण १ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९९ हजार ३८१ रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९४.०६, टक्के, नाशिक शहरात ९६.१९ टक्के, मालेगावमध्ये ९३.७४ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ इतके आहे.
तालुकानिहाय बाधित रुग्ण
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुक्यांमध्ये नाशिक ७३, चांदवड ७७, सिन्नर २८९, दिंडोरी ५२, निफाड २७५, देवळा २६, नांदगाव ७८, येवला १५, त्र्यंबकेश्वर ३०, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण १७, बागलाण ५८, इगतपुरी २४, मालेगाव ग्रामीण २५ असे एकूण १ हजार ४० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६०१, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ९७, तर जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण २ हजार ७६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.