पेठ : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून पावसाने परत आपले रौद्ररूप दाखवले असून, पेठ तालुक्याला झोडपून काढले आहे.दमणगंगा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने नदीकाठच्या गावांची वाताहात झाली असून, रस्त्यांची पूर्ण चाळण झाल्याने नागरिक त्रासले आहेत. नद्या-नाल्यांवरील फरशा व पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खडकी, उम्रद, बोंडारमाळ, खामशेत, गायधोंड, बिलकस, बोरपाडा, धानपाडा आदि नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे. भुवन घाटात चार-पाच ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहनधारक दगड माती बाजूला करत जीवघेणा प्रवास करत आहेत.भात शेती नष्ट४प्रचंड पावसाने उतारावरील नागली, वरई व खाचरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खाचरात (आवणात) मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बांध फुटून शेती वाहून गेली तर बऱ्याच शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भातपिके बुडाली आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस लावणी केलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, रोपे संपल्याने दुबार लावणीही करू शकत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असण्याची चिन्हे दिसत आहेत.अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे४दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून, ग्रामसेवक, तलाठी यांनी परिस्थितीचा अहवाल कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व पंचायत समितीच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.आंबेगणचा वळण बंधारा धोकेदायक४दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाटानजीक बांधलेल्या वळण बंधाऱ्याचा पूर्वेकडील सांडवा बंद झाल्याने बांधावर पाण्याचा दाब वाढला असून, यामुळे पेठ तालुक्यातील शिंदे, आड भागाला पुराचा धोका निर्माण झाल्याची चर्चा असून, सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पेठ तालुक्यात पुन्हा मुसळधार; रस्त्यांची चाळण, पुलांची दुरवस्था
By admin | Published: August 06, 2016 10:26 PM