पेठ : गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याने पेठ पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मद्यतस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिीसांना यश आले आहे.शनिवारी सकाळी गुजरात राज्यातून येणारी खासगी कार (क्र . एमएच ०३ सीएम २४०४) पोलिसांनी चेकनाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने संधी साधून कार वेगात घेऊन नाशिककडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब पोलीस उपनिरीक्षक भरसट यांना समजल्यावर त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवले. पोलीस नाईक किरण बैरागी व सुनील तुंगार यांच्या मदतीने करंजाळी येथे नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांचा पाठलाग व समोर नाकाबंदी पाहून वाहन चालक व त्याचा एक साथीदार वाहन सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात जवळपास दोन लाख ५६ हजार ९२० रु पये किमतीचा दमणनिर्मित मद्यसाठा आढळून आला. ५ लाखांच्या वाहनासह ७ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल व संशयित संदेश आरीफभई लोहिया (३२, रा. नवसारी गुजरात) व मेहफूस समीर अन्सारी (२५, रा. सुरत) यांना अटक करण्यात आली. याबाबत पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरसट, किरण बैरागी, सुनील तुंगार, खिरकडे, जव्हारी, डंबाळे, रेहरे आदी तपास करीत आहेत.
पेठ तालुक्यात अडीच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:47 AM