पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जागतिक पर्यावरणदिनी नाशिक पश्चिम वनविभागाने पेठ तालुक्यातून ‘पक्षी वाचवा, गलोल हटवा’ या अभियानाला प्रारंभ केला होता. उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ वनपरिक्षेत्राच्या चमूने सुमारे शंभरापेक्षा अधिक उंबरठ्यांना भेटी देत ‘गलोल द्या, गिफ्ट घ्या’ अशी साद घातली.
वनरक्षक, वनपालांना आपापल्या कार्यक्षेत्र असलेल्या गावांमध्ये या अभियानाबाबत कमालीची जनजागृती केली. येथील विविध ग्रामपंचायतींकडूनदेखील या अभियानाला पाठिंबा दिला गेला आणि अभियान यशस्वी झाले. परिवीक्षाधीन उपवनसंरक्षक आनंद रेड्डी यांनी विद्यार्थी मनोज आवारी (सायकल), दर्शन प्रधान (क्रिकेट किट), वैभव घंगाळे (व्हाॅलीबॉल) या तिघा भाग्यवंत विजेत्यांची नावे घोषित केली. चिमुकल्यांनी घरातील कानाकोपऱ्यात दडवून ठेवलेले गलोल आणून वनकर्मचाऱ्यांकडे सोपविल्या. वनकर्मचाऱ्यांनीही त्यांचे कौतुक करत त्यांना शालेय साहित्यरूपी गिफ्ट दिले.
---इन्फो---
असे केले लहानग्यांचे मनपरिवर्तन
पक्ष्यांची शिकार करणे वन्यजीव संवर्धन कायद्यान्वये गुन्हा असून, पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. ही पृथ्वी आणि येथे वाढणाऱ्या निसर्गावर प्रत्येक सजीवाचा हक्क आहे. यामुळे गलोलीने पक्ष्यांवर ‘नेम’ धरत त्यांची शिकार करणे हा गुन्हा ठरतो, असे वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी गाव, पाड्यांवर जाऊन लहानग्यांना पटवून दिले. ठिकठिकाणी पक्ष्यांचे महत्त्व सांगणारे कापडी भित्तीफलके लावण्यात आली.
---इन्फो---
अर्धा डझन पिंजरेही केले सुपुर्द
भारतीय पोपटांना पाळीव पक्षी म्हणून पाळण्यासाठी काहींनी पारंपरिक पद्धतीने घरांच्या आतील बाजूने पिंजरेही लटकवून ठेवलेले होते. भारतीय पोपटाला पिंजऱ्यात कैद करून ठेवणेदेखील वनकायद्यानुसार गुन्हा आहे, हे जेव्हा वनकर्मचाऱ्यांनी प्रबोधनादरम्यान सांगितले तेव्हा काही लहानग्यांनी त्यांच्या घरात असलेले पोपटाचे पिंजरेही वनकर्मचाऱ्यांना सोपविले. या अभियानात सुमारे अर्धा डझन पिंजरेही जप्त झाल्याचे सीमा मुसळे यांनी सांगितले.
--इन्फो--
वन बीटनिहाय गलोल संकलन असे....
पेठ बाजार-११६
बादगी बीटमधील नऊ गावांतून ५४, रानविहीरमधून २३, करंजाळी- १३, आड-३०, कोहोर- ४५, सिंगदरी-३१, भुवन-४४, आडगाव-३०, अंबापाणी-३३, उसथळे- ३४, आंबा-४१, म्हसगण- ६५, दाभाडी-४५, गांडोळा-१३, सुरगाणा दक्षिण-१७, सुरगाणा उत्तर-१६, सावर्णा-१४.
120721\12nsk_49_12072021_13.jpg
संकलन झालेल्या गलोलीचा आनंद व्यक्त करताना वनधिकारी, वनकर्मचारी