नाशिक : जिल्ह्यातील सटाणा शहराच्या पुनद पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पुनद पाणी पुरवठा योजनेचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिल्याने सटाणा शहर वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.पुनद पाणी पुरवठा योजनेचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ जूनला पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले. दैनंदिन कामकाजाचा आढावा १५ जुलैला न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर कळवण तालुक्यातील शेतकरी संदीप सुधाकर वाघ यांनी पुनद पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर १५ जुलैला सुनावणी होवून संदीप वाघ यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत पुनद पाणी पुरवठा योजनेवर कोणीही अर्ज करू शकत नसल्याचे स्पष्ट केले .पुनद पाणी पुरवठा योजनेसंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने सहा महिन्यात योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पुनद पाणी पुरवठा योजना ही तांत्रिक मंजुरी घेवूनच शासनाने सुरु केलेली असल्याने ही योजना चुकीचे आहे, असे म्हणताच येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.धरणातील पाणी ही कोणाची खाजगी मालमत्ता नसून गरजेनुसार कोणालाही पाणी देता येवू शकते असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पुनद योजनेविरोधातील याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:54 PM
उच्च न्यायालय : सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश
ठळक मुद्देपुनद पाणी पुरवठा योजनेचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ जूनला पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले