नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यलयात याचिका दाखल करताना जळगाव महापालिकेतील गटनेता भगत बालानी, नाशिक महापालिकेतील भाजप गटनेते जगदीश पाटील, ॲड. सतीश भगत, ॲड. शरद मेढे पाटील, ॲड. जयंत गोवर्धने, सर्वेश भगत, आदी उपस्थित होते.
जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले असून, गेल्या १८ मार्च रोजी झालेेल्या निवडणुकीत त्यातील २७ नगरसेवक फुटले होते. शिवसेनेच्या अगोदरपासूनच संपर्कात असलेले हे नगरसेवक नंतर संपर्कक्षेत्राबाहेर गेले. त्यामुळे भाजपने त्यांना पक्षादेश बजावण्यासाठी मोबाईल एसएमएस, वॉटसॲप, जाहीर प्रकटन, प्रत्यक्ष अथवा घरावर पक्षादेश चिटकविणे, मेल करणे अशा सहा ते सात प्रकारे पक्षादेश बजावून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही १८ मार्चला झालेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले. या निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. त्यामुळे भाजपने नगरसेवकांना कायदेशीर धडा शिकविण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. यात प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुक्सानाबी गबलू खान यांच्यासह अन्य नगरसेवक, तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनादेखील प्रतिवादी ठरविण्यात आले आहे.
इन्फो..
भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी पक्षादेशाचा भंग केल्याने त्यांना उर्वरित कालावधीकरिता अपात्र घोषित करावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आगमी पाच वर्षे त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.