नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने लॉकडाऊन लागू केल्याने अन्य व्यावसायिकांप्रमाणेच पेट्रोलपंप व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या विक्रीत सुमारे ७० ते ७५ टक्के घट झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर, सुरुवातीच्या काळात पेट्रोल पंपाना निर्बंधांतून शिथिलता होती. मात्र, ग्राहकच घराबाहेर पडत नसल्याने व्यावसायिकांना जवळपास ५० टक्के फटका बसला होता, परंतु गेल्या १२ मेपासून जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल डिझेल विक्रीस सवलत देण्यात आली असून, सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल- डिझेल विक्री करण्यावर निर्बंध आणल्याने विक्रीत आणखी २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. शहरात सामन्य परिस्थितीत जवळपास ११ ते १२ हजार लीटर पेट्रोल-डिझेलची विक्री करणाऱ्या पंपांची सध्या केवळ दोन ते अडीच हजार लीटरपर्यंत विक्री होत असून, विक्रीत घट झाल्याने पेट्रोलपंप चालकांना कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्च करणेही अवघड होऊन बसल्याची प्रतिक्रिया पेट्रोलपंप चालकांनी व्यक्त केली आहे.
कोट-
पेट्रोलपंप चालकांचे टाळेबंदीमुळे नुकसान होत असले, तरी व्यावसायिकांना प्रशासनाच्या नियमानुसार काम करावे लागते. त्यामुळे सर्व सामान्यांना पेट्रोल डिझेलची विक्री बंद आहे. मात्र, आपत्कालीन काळात परिस्थितीनुरूप गरजेनुसार नागरिकांना मदत करण्याची व्यावसायिकांची भूमिका आहे.
- अमोल जाधव, मेहेता पेट्रोल पंप
कोट-
राज्य सरकारचे लॉकडाऊन लागल्यानंतर सुमारे ५० टक्क्यांपर्यंत विक्री खाली आलेली होती. त्यात जिल्ह्यातील कडक निर्बंधानंतर ती आणखी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत खालावलेली आहे. विक्री कमी झाल्याचे दु:ख नाही, पण आपला जिल्हा, राज्य कोरोनातून मुक्त व्हावे, हीच व्यावसायिकांची इच्छा आहे. मात्र, या कडक निर्बंधांच्या काळात नियमांवर बोट ठेवणारे प्रशासन आणि आग्रही व आक्रमक ग्राहक यांच्या कात्रीत पंपचालक सापडले आहेत.
- विजय ठाकरे, उपाध्यक्ष, फामपेडा (राज्य पेट्रोल डीलर्स संघटना)