नाशिक : राज्य शासनाने महापालिका हद्दीतील पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी सरसकट रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाशिक शहरात पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ३० पैशांनी, तर डिझेल १ रुपये ४० पैशांनी स्वस्त होणार असले तरी शासनाने २ रुपये दुष्काळी सेस लागू केल्याने शहरवासीयांना पेट्रोल फक्त ३० पैशांनी स्वस्त मिळणार आहे. मात्र, डिझेलमध्ये प्रतिलिटर ६० पैसे जादा मोजावे लागणार आहे. सध्या शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६७.८० रुपये, तर डिझेलचा दर ५०.८० रुपये आहे. राज्य शासनाने १ आॅगस्टपासून राज्यातील २५ महापालिकांमधील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी कायम ठेवला होता. त्यातही ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीमुळे पेट्रोलपंपचालकही एलबीटीच्या फेऱ्यात अडकलेले होते. त्यामुळे, पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याची मागणी पेट्रोल व डिझेलचालकांच्या फामपेडा या संघटनेने शासनाकडे केली होती. दि. ७ सप्टेंबर रोजी पेट्रोलपंप बंद आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता. त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन संघटनेला दिल्याने बंदचा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलच्या कमी झालेल्या किमतीमुळे राज्य शासनाच्या महसुलात झालेली घट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पेट्रोल व डिझेल यावर प्रतिलिटर २ रुपये कर वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. यासोबतच उलाढालीची मर्यादेची अट न ठेवता पेट्रोल व डिझेल यावरील स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी सरसकटपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिक महापालिका हद्दीतील पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द होणार आहे. महापालिका हद्दीत पेट्रोल व डिझेलवर ३ टक्के एलबीटी आकारला जातो. आता हा एलबीटी रद्द होणार असल्याने शहरात पेट्रोल २ रुपये ३० पैशांनी, तर डिझेल १ रुपये ४० पैशांनी स्वस्त होणार आहे. परंतु, शासनाने २ रुपये कर वाढविल्याने नाशिककरांना पेट्रोल फक्त ३० पैशांनी स्वस्त मिळणार आहे, तर डिझेलसाठी मात्र ६० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना पेट्रोल प्रतिलिटर ६७.५० रुपयांनी, तर डिझेल ५१.४० रुपयांनी उपलब्ध होणार आहे. शहराच्या हद्दीबाहेर ग्रामीण भागात मात्र तेथे एलबीटी नसल्याने पेट्रोल व डिझेलचे दर २ रुपयांनी वाढणार आहेत. (प्रतिनिधी)
शहरात पेट्रोल फक्त ३० पैशांनी स्वस्त
By admin | Published: September 30, 2015 11:44 PM