पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून रात्रीच्या सुमारास घरापुढे उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून पेट्रोल व डिझेल तसेच बॅटरी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून या पेट्रोल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता चोरट्यांनी आपला मोर्चा पेट्रोल, डिझेल चोरीकडे वळविला आहे. या सक्रिय टोळीने इंधन चोरीचा सपाटा लावल्याने वाहन मालकांमध्ये दहशत पसरली आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या व ट्रॅक्टर घराच्या पडवीत अथवा घरासमोर व झाडांखाली उभ्या केलेल्या असतात ही टोळी अलगद या वाहनांमधून पेट्रोल व डिझेल तसेच बॅटरी चोरून नेत आहे हा प्रकार रोजच घडत असल्याने या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.