नाशिक : महापालिका क्षेत्रात पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी संपूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी सोमवारी (दि.७) घोषित केलेला बंद राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात ैआल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी दिली. दरम्यान, पेट्रोल पंपांचा बंद लक्षात घेता वाहनधारकांनी गरजेपुरता इंधन भरण्यासाठी शहरातील पंपांवर गर्दी केली होती.फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने (फामपेडा) सदर बंदची हाक दिली होती. राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली; परंतु पेट्रोल व डिझेल यावरील एलबीटी कायम राहिला. संघटनेने एलबीटी विरोधात सरकारकडे पाठपुरावाही केला. पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी माफ झाल्यास त्याचा फायदा थेट जनतेला होऊन सुमारे २ ते ५ टक्के दर कमी होण्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, शासनाकडे याबाबत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने आंदोलनाचे पाऊल उचलल होते. सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून राज्यातील महापालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंप एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी अर्थमंत्र्यांनी संघटनेच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चाही केली; परंतु मागण्यांबाबत अनुकूलता न दर्शविल्याने अखेरीस पंपचालकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर अर्थमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि दि. ६ आॅक्टोबरपूर्वी पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर बंद मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)
पेट्रोल पंपचालकांचा बंद मागे
By admin | Published: September 07, 2015 12:20 AM