नाशिक: राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या ‘पीएफआय’च्या ‘त्या’ पाच सदस्यांच्या मोबाइलमधील संभाषणाचा डेटा नष्ट केल्याच्या संशयावरून जळगावातून नाशिकएटीएस पथकाने अटक केली. शनिवारी (दि.२२) त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.
देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी हे धाडसत्र राबविले होते. या गुन्ह्याच्या तपास करताना आता पीएफआयचे धागेदोरे मालेगाव, बीड पुणेमार्गे थेट जळगावपर्यंत जाऊन पोहचले आहे.
एटीएसने जळगावातून सहावा संशयित आरोपी उनैस उमर खय्याम पटेल (३१) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाशिकच्या एटीएस कार्यालयात त्याची सलग तीनदा चौकशी करून जाबजबाब नोंदविण्यत आला. संशयिताविरुद्ध पुरावे एटीएस पथकाच्या हाती लागल्याने पटेल यास शुक्रवारी (दि.२१) रात्री सव्वा नऊ वाजता अटक करण्यात आली. त्यास शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले गेले. यावेळी सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी बाजू मांडली. यावेळी पटेलच्या बाजूनेही वकिलाने युक्तीवाद करत तीन दिवस एटीएसला त्याने पुर्ण सहकार्य तपासात केले असल्याचा दावा केला. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत संशयित पटेल यास येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली.
न्यायालयातील युक्तीवाद असा....
पटेल याने संशयितांपैकी सर्वात अगोदर पुण्याच्या अब्दुल कय्युमच्या मोबाइलमधील संभाषण नष्ट केले. यानंतर उर्वरित संशयितांचे मोबाइलमधीलदेखील संभाषण त्याने नष्ट केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्याकडून एक मोबाइल, लॅपटॉपदेखील जप्त केले आहे. त्याचीही पडताळणी करावयाची आहे. मोबाइल कंपन्यांकडून संभाषण रिकव्हर करावा लागणार असल्याने त्यास पुरेसा वेळ लागणार आहे. दरम्यान, पाचही संशयितांच्या मोबाइलमधील संवाद कोठे व कसे आणि कोणाच्या मदतीने नष्ट केले हे शोधायचे आहे. यासाठी पटेलला एटीएस कोठडी दिली जावी. त्याच्याकडून अधिक माहिती गुन्ह्याच्या तपासासाठी मिळू शकणार आहे. असा युक्तीवाद सरकारपक्षाच्या वतीने अजय मिसर यांनी न्यायालयात केला.
२६दिवसांच्या कोठडीनंतर कारागृहात!
नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या होत्या. २६दिवसांची एटीएस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सध्या त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. उनैस पटेल हा पुण्याचा संशयित वसीम उर्फ मुन्नाच्या माध्यमातून पीएफआयच्या पाच संशयितांच्या संपर्कात आला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"