नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले. नाशिकच्या महापौरपदी कुलकर्णी यांची शुक्रवारी (दि.२२) निवड झाली. त्यानंतर त्यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी आपल्या कल्पना मांडल्या.
प्रश्न- सामान्य नगरसेवक ते शहराचा प्रथम नागरीक या प्रवासाविषयी काय सांगाल?कुलकर्णी- मी मुळातच राजकारणी नाही. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते काम मी डीजीपी नगर परिसरात करीत होतो. १९९७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होती. त्यावेळी माझे काम बघून परिसरातील नागरीकांनी भाजपाचे नेते (कै.) बंडोपंत जोशी यांची भेट घेतली. आणि मला उमेदवारी देण्याची मागणी केली. जोशी यांनी मला संधी दिली आणि प्रथमच निवडून आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत पाच वेळा निवडून आलो. नागरीकांच्या प्रेमामुळेच मी महापौरपदापर्यंत पोहोचू शकलो.
प्रश्न- महापौर झाल्यानंतर प्रत्येक जण काही तरी वेगळी योजना राबवितो तुमची कल्पना काय?कुलकर्णी- आवाक्यात असलेल्या घोषणाच केल्या पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे मी नाशिकचे सिंगापूर करेल वगैरे घोषणा करणार नाही. परंतु नाशिकच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार आहे. मी आरोग्य सभापती असताना खूप निर्णय घेतले. त्यातील काही अमलात आले तर काही प्रशासनाने अडवले. परंतु शहर स्वच्छ झाले पाहीजे याला प्राधान्य राहणार आहे.
प्रश्न- तुमचा ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल?कुलकर्णी- शहरात चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक असून काही वर्षांपूर्वी पर्यंत ते शहराचे भूषण होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळेत त्याची रया गेली आहे. त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करेल. शहरातील कानेटकर उद्यान तसेच अन्य अनेक प्रकल्प बंद स्थितीत असून ते सर्व प्रथम सुरू करणार आहे. या शिवाय शहरातील नागरीकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या त्याच्या भागातील समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.मुलाखत- संजय पाठक