नाशिक : औषध निर्माणशास्त्र विद्याशाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा संपूर्ण देशात एकच करण्यात आला असून, या क्षेत्रातील अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक व व्यावसायिकांसाठी हा सर्व अभ्यासक्रम फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जेएसएस विद्यापीठाचे कुलगुरू तथा पीसीआयचे अध्यक्ष बी. सुरेश यांनी दिली.फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२९) नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील फार्मसी प्राध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेनंतर बी. सुरेश यांनी पंचवटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात काही सूचना केल्या असून, त्यांचा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास करून समावेश करण्याविषयी पीसीआय विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर एकच अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर या विद्याशाखेचा विद्यार्थी देशभरात अथवा देशाबाहेर कुठेही असला तरी त्याला अभ्यासक्रमाच्या स्रोतांसह, लाइव्ह लेक्चर आणि अन्य माहिती पीसीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची काम सुरू असून, वर्षाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पीसीआयने फार्म डी हा नवीन अभ्यासक्रम तयार केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.केंद्रीय पद्धतीने होणार नोंदणीफार्मासिस्ट म्हणून व्यवसाय करणाऱ्यांना सध्या फक्त कार्यरत असलेल्या राज्यातच नोंदणी करावी लागते. मात्र, प्रत्येक राज्यात वेगवेगळी नोंदणी असल्याने देशातील सर्व फार्मासिस्टची एकत्रित माहिती केंद्राकडे उपलब्ध होत नाही. हीच बाब लक्षात घेता फार्मासिस्ट रजिस्टर ट्रॅकिंग सिस्टिम अर्थात पीआरटीएसद्वारे देशातील सर्व फार्मासिस्टची केंद्रीय पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे. या प्रकारामुळे एकाच नोंदणीवर वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करण्याच्या प्रकाराला आळा बसणार असल्याचे डॉ. बी. सुरेश यांनी सांगितले.
औषधनिर्माण अभ्यासक्रम, प्रशिक्षण होणार आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:14 AM