नाशिक : महापालिकेच्या वतीने पंचवटीतील सावित्रीबाई फुले (मायको) दवाखाना व प्रसूतिगृहात अपुरा कर्मचारी वर्ग आणि असुविधांमुळे रुग्ण विशेषत: गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गरोदर महिलांसाठी लागणाऱ्या रक्तवाढ व कॅल्शियमच्या गोळ्यांची टंचाई आहे, अशी तक्रार या रुग्णालयात गेल्या शनिवारी (दि.८) वॉर्ड सभेत करण्यात आला. रुग्णालयातील उपलब्ध कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करीत असले तरी दीड महिन्यांत १२ बालमृत्यू झाल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. पंचवटीतील लोकनिर्णय सामाजिक संस्थेच्या वतीने पंचवटीतील मायको दवाखान्याच्या संदर्भात आरोग्य विषयक वॉर्डसभा संपन्न झाली. यावेळी दवाखान्याच्या डॉ. श्रीमती सांळुखे, डॉ. निकम, नगरसेवक प्रा. सरिता सोनवणे, लोकनिर्णयचे संतोष जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.२००४ साली सुरू झालेल्या या दवाखान्यात आजतागायत रुग्णाांना व कर्मचाºयांनादेखील पिण्याचे पाणी उपलब्ध नाहीत. प्रसूतीसाठी पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षाकाठी जेमतेम पन्नास प्रसुति होतात. सिझरची सोय नाही. दवाखान्यातील उपलब्ध कर्मचारी आपल्यापरीने सेवा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी वर्षभरात १४ बालमृत्यू झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. या रुग्णालयात स्वच्छतेसाठीदेखील शिपाई उपलब्ध नाही. येथील वैद्यकीय अधिकाºयांवर म्हसरूळ व मखमलाबाद येथील कामाचा अतिरिक्त बोजा आहे. त्यामुळे तेथे स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग चालवण्याची व्यवस्था करावी, स्थानिक रुग्णालयातदेखील पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच दीड वर्षांत विविध कारणांमुळे बारा बालमृत्यू झाले असून, त्यासंदर्भात अहवाल तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी दवाखान्यात लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून जाईल, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले तर अन्य समस्यांविषयी महासभेत पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रा. सरिता सोनवणे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नंदा पवार यांनी तर स्वागत कमल मते यांनी केले. प्रास्ताविक सविता जाधव यांनी केले, तर आभार संगीता कुमावत यांनी मानले. यावेळी संतोष जाधव, पद्माकर इंगळे, वैशाली पवार, अनिल निरभवणे आदी उपस्थित होते.
फुलेनगरच्या दवाखान्यात औषधांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:17 AM