नाशिक : विंदा करंदीकर यांच्या विचारांचा प्रखर वेग आणि शब्दांचे सामर्थ्याच्या अनुभूतीसोबतच त्यांचे ललित लेखन, नाटक, बालकविता, अनुवाद यांची अनोखी पर्वणी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सावरकरनगरमधील नाशिक विभागीय केंद्रातर्फे ठाकूर रेसिडेन्सी येथील सभागृहात शनिवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला कवी विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी ‘माझ्या मना बन दगड’सारखी अस्तित्वाला भिडण्याची जाणीव करून देणाऱ्या कवितेसोबतच ‘फाउस्ट’ अनुवादित नाटकातील उतारा मंत्रमुग्ध करून गेला. विंदांच्या लेखनातील नाट्यमयता, चित्रमयता यांचे अनोखे दर्शन वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी ताह्मनकर, माधव गावकर या कलाकारांनी रसिकांना घडवले. कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर, तर निर्मिती संकल्पना व नेपथ्य वामन पंडित यांचे होते. माधव गावकर यांच्या संगीताने कार्यक्रमात रंगत भरली. प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. यावेळी निवृत्ती अरिंगळे, कवी किशोर पाठक, अरविंद ओढेकर, डी. जे. हंसवाणी, डॉ. फय्याज रघुनाथ फडणीस, कवी लक्ष्मण महाडिक, डॉ. प्राचार्य लीना पांढरे, डॉ. विवेक खरे यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते.
विंदा यांच्या साहित्य निर्मितीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:39 AM