सिडको : फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारीरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती. मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डी फाटा येथे करण्यात आलेल्या जाहीर सत्काराप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धा जिंकल्यानंतर नाशिकला सिंगल यांचे सोमवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. शहराच्या वेशीवर नाशिककरांसह पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. यावेळी सिंगल म्हणाले, प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरु वात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा प्रकारच्या खडतर स्पर्धेत विजेतेपद पटकाविणे हे मोठे आव्हान होते. मात्र दैनंदिन व्यायाम, सायकलिंगची सराव असल्यामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मी स्पर्धा जिंकू शकलो.यावेळी उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त बापू बांगर, शांताराम आडके, अशोक नखाते, शांताराम पाटील, मोहन ठाकूर, अजय देवरे, पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात नाशिक पोलीस आयुक्तालय व तमाम नाशिककरांच्या वतीने सिंगल यांचे पोलिसांच्या बँड पथकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिंगल यांच्या समवेत त्यांचे वडील झिलेसिंग सिंगल, आई कांतादेवी सिंगल तसेच आयर्नमॅन स्पर्धेतील स्पर्धक त्यांची कन्या रविजासह पत्नी विनिता सिंगल यादेखील उपस्थित होत्या.
शारीरिक -मानसिक संयमाची कसोटी : रवींद्रकुमार सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:16 AM